खुल्या जागांवर गुणवत्तेचा हक्क अबाधित राहिलाच पाहिजे — रामदास आठवले

Talk18 मराठी (नागपूर ):
स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखण्याचा राज्य सरकारचा निर्णय वादाच्या भोऱ्यात सापडला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण होत असेल, तर त्या वर्गीकरणात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका आठवले यांनी मांडली. सध्या जातनिहाय जनगणना सुरू असल्याने त्यानंतरच आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याचबरोबर “खुल्या प्रवर्गातील जागांवर गुणवत्तेच्या आधारे निवड होणे हा प्रत्येक उमेदवाराचा अधिकार आहे. गुणवत्तेवर निवड होणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होता कामा नये,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात असल्याचा दावा करत, हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही आठवले यांनी केली. तसेच बौद्ध समाजाने जनगणनेत आपल्या मूळ जातीची नोंद करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


