Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

महिला सक्षमीकरणाला नवी दिशा; वेळापूरच्या परिवर्तन लोकसंचलीत साधन केंद्राची १० वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

Talk18 मराठी l वेळापूर प्रतिनिधी :२० जुलै

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय सोलापूर अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका अभियान कक्ष माळशिरसच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्र, वेळापूर यांच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन दि. १७ जुलै २०२६ रोजी शिवशंभो मंगल कार्यालय, वेळापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या सन २०२५-२६ या वर्षातील कामकाजाचा अहवाल सादर करण्यात आला. महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे वित्तपुरवठा, स्वयंरोजगार निर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, किराणा व्यवसाय, शिवणकाम, भाजीपाला विक्री आदी विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट, एमआरपी आणि ग्रामसंघांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई जानकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. मिनाक्षीताई मिलिंद सरतापे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, सभेच्या दिवशी आमदार उत्तमराव जानकर यांचा वाढदिवस असल्याने उपस्थित महिला भगिनींनी आणि मान्यवरांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा केला. टाळ्यांच्या गजरात आणि शुभेच्छांच्या वर्षावात वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले, “महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळ असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळापूरच्या परिवर्तन लोकसंचलित साधन केंद्राला आणि महिला बचत गटांना माझ्याकडून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे निश्चितपणे केले जाईल.” त्यांच्या या आश्वासनाचे उपस्थित महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

कार्यक्रमाच्या शेवटी लेझीम, लावणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सभेला रंगत आणली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी मंडळ, सीआरपी, क्षेत्र समन्वयक, ग्रामसंघ लेखापाल तसेच सर्व सभासदांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button